जामखेड प्रतिनिधी
वंजारवाडी येथे भरदिवसा दोन ते तीन ठिकाणी घरफोडी झाली. यावेळी संशयीत लोकांची गाडी अडवून त्यांची विचारपुस केली. मात्र चोरी झालेल्या लोकांवर व ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले. सदरचे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात पुढे म्हंटले आहे की दि.६ रोजी वंजारवाडी व धानोरा येथील मधुकर दत्तू जायभाय, शिवाजी बाबासाहेब जायभाय, नाजुका बाबासाहेब जायभाय, आशाबाई व हनुमान जायभाये यांच्या घराचे कुलूप व कडी तोडून चोरी झाली होती. ही माहिती वंजारवाडी येथील ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या नंबर वरती फोन करून सर्वांना माहिती दिली. माहिती समजताच बाजूच्या परिसरातील लोकांनी संशयित व्यक्तींची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. सदर गाडी आरणगाव येथे अडवण्यात आली. त्या वेळी सदर संशयित लोकांनी उलट-सुलट भाषा वापरली व गाडी का थांबवली व विचारपूस करणाऱ्याला संशयीतांनी मारहाण केली. त्यावेळी काही संशयित लोकांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या त्या वेळी संशयित व जमाव यांच्या मध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी आरणगाव येथील काही लोकांनी संशयीत व जमावास बाजूला केले. त्यानंतर वंजारवाडी येथील ज्या लोकांची चोरी झाली त्यांच्यावर व इतर काही वंजारवाडी व धानोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. संशयित लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालय येथे निवेदन दिले आहे. येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असे गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी निवेदन देताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, स्वा. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे व ग्रामस्थ उपस्थित होते.






