संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेचा प्रारंभ; शिवलीलामृत पारायणास महिलांचा मोठा सहभाग

जामखेड (प्रतिनिधी)

जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त शहरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात ‘शिवलीलामृत’ पारायण सोहळ्यासह संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास बुधवारी उत्साहात प्रारंभ झाला असून शिवलीलामृत पारायणास महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. श्रीक्षेत्र तेर (गोरोबा काकांचे) येथील सकल संत चरित्र व श्रीराम कथा प्रवक्ते ह.भ.प. श्री. दीपकजी महाराज यांच्या वाणीतून सात दिवस संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्र कथेचे श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. बुधवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संगीतमय चरित्र कथेचा प्रारंभ झाला.

 

बुधवारी रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, शिऊरचे अध्यक्ष श्री. उमेश देशमुख व सौ. उन्नती उमेश देशमुख यांच्या हस्ते वीणा पूजन करून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ॲड. महारुद्र महाराज नागरगोजे यांचे कीर्तन झाले.

दरम्यान, सप्ताहातील विविध दिवशी नामवंत महाराजांची कीर्तने होणार आहेत. गुरुवारी बाळासाहेब महाराज गाडे, शुक्रवारी रामचंद्र महाराज शिंदे, शनिवारी राजेंद्र महाराज म्हेत्रे, रविवारी संतोष महाराज बांगर, सोमवारी दादासाहेब महाराज सातपुते तर मंगळवारी विवेकानंद महाराज मंजरतकर यांची कीर्तने होणार आहेत. बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मालेगाव येथील चेतन महाराज बोरसे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाने या संपूर्ण धार्मिक उत्सवाची सांगता होणार आहे.

दैनंदिन कार्यक्रम सप्ताहादरम्यान पहाटे काकडा, सकाळी ८.३० ते १० या वेळेत श्री शिवलीलामृत पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी ३ ते ४.३० कीर्तन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि त्यानंतर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथा होणार आहे. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी होणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीनागेश्वर पालखी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीनागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here