


नान्नज परिसरातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहाजीराजे भोसले यांचे ७ ऑगस्टपासून उपोषण
बसस्थानक, रस्ते, बँक, मोबाईल नेटवर्कसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधणार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे गेल्या आनेक वर्षांपासून नान्नज बस स्थानकाची मागणी होत आहे. याच आनुशंगाने याठिकाणी नविन बस स्थानक व्हावे तसेच नान्नज भागातील विविध मागण्यांसाठी जामखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शहाजी राजेभोसले हे शुक्रवार दि ७ ऑगस्टपासून पासुन नान्नज येथील दुरावस्था झालेल्या जुन्या बस स्थानकासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत तहसीलदार यांना देखील निवेदन दिले असून नुकतीच नान्नज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना शहाजी राजेभोसले म्हणाले की, नान्नज हे जामखेड तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे प्रमुख गाव असून परिसरातील १२ ते १३ गावांचा दैनंदिन संपर्क या गावाशी आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक तसेच विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना नान्नज येथे ये-जा करावी लागते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील अनेक मूलभूत सुविधा आजही अपुऱ्या असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विषेश म्हणजे नान्नज हे ऐतिहासिक महत्त्वाचे गाव असूनही येथे अद्याप स्वतंत्र बसस्थानकाची सुविधा उपलब्ध नाही. पंचवीस ते तीस गावांतील नागरिक या ठिकाणी ये-जा करत असताना प्रवाशांना बसण्यासाठी निवारा नाही. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना बसची प्रतीक्षा करताना उन्हात व पावसात उभे राहावे लागते. तसेच स्वच्छतागृहाचीही कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने सुसज्ज नवीन बसस्थानक उभारण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय नान्नज हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव असूनही येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उपलब्ध नसल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी इतर गावांमध्ये जावे लागते. शेतकऱ्यांनाही विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. त्यामुळे नान्नज येथे तातडीने राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मोबाईल नेटवर्कची अत्यंत खराब स्थितीही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणत्याही मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीचे समाधानकारक नेटवर्क उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरात आवश्यक मोबाईल टॉवर उभारून नेटवर्क सुविधा सुधाराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नान्नज–गुरेवाडी, नान्नज–चोभेवाडी तसेच नान्नज–पोतेवाडी या प्रमुख रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच नान्नज–जवळका रोडवरील नदीवरील बंधाऱ्याची दुरुस्ती करून तो पूर्ववत करण्यात यावा. धोंडपरगाव ते बोर्ले नांदणी नदीवर तसेच गुरेवाडी तलाव ते जवळका रोड या ओढ्यावर आवश्यक त्या ठिकाणी नवीन बंधारे मंजूर करून पाणी अडविण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
लोकशाही मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी शुक्रवार, दि. ७ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे शहाजी राजेभोसले यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धारही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या पत्रकार परिषदे दरम्यान नान्नज येथील भरत मोहळकर, अंकुश मोहळकर, सचिन मंलगणेर, गणी पठाण, जमील शेख, युनुस पठाण, आदम शेख, भुंजग दळवी, पोपट क्षीरसागर, अजय रजपूत, नितीन पाद्रे, सुरेश मोहळकर, अजिनाथ कुमटकर, अमर चाऊस सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमुळे नान्नज परिसरातील प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








