


नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे दुर्दैवी घटना
कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे (वय १९) या विद्यार्थिनीने नीट (NEET) परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५ जुलै) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता सुरेश सांगळे (रा. जलालपूर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिने नीट परीक्षेत १६६ गुण मिळवले होते. मात्र अपेक्षित गुण न मिळाल्याने ती मानसिक तणावाखाली होती. शनिवारी (दि. २५ जुलै) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या घरातील स्वतंत्र अभ्यासिकेत गळफास घेऊन जीवन संपविले.
घटना घडली तेव्हा तिचे वडील व भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. घरात आई एकटीच होती. ती घरकामात व्यस्त असताना अंकिता तिच्या अभ्यासाच्या खोलीत होती. बराच वेळ कोणतीही हालचाल किंवा आवाज न आल्याने आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता अंकिताने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हे दृश्य पाहून त्या घाबरून गेल्या व त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली.

परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी अण्णा सांगळे यांनी दिलेल्या खबरीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंकितावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटले?
आत्महत्येपूर्वी अंकिताने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तिने नमूद केले आहे की, २१ जून २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेत तिला १६६ गुण मिळाले असून कट-ऑफ १७७ गुणांचा आहे. तिने ही परीक्षा अहिल्यानगर येथील केंद्रावरून दिली होती. अपेक्षित यश मिळाले नसल्याने ती नैराश्यात गेली होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्याची खंतही तिने व्यक्त केली आहे.

तसेच, “या आत्महत्येसाठी माझे आई-वडील, भाऊ किंवा कुटुंबातील कोणालाही जबाबदार धरू नये,” असा स्पष्ट उल्लेख तिने सुसाईड नोटमध्ये केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जलालपूरसह संपूर्ण कर्जत तालुक्यात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत आणि स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या तणावाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अंकिताचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. तिने यापूर्वी ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुन्हा २१ जून रोजी घेण्यात आली. फेरपरीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक नैराश्यात गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

अंकीता चे काका अण्णा सांगळे (काका) म्हणाले की “अंकिताला डॉक्टर व्हायचे होते. ती अभ्यासू होती. फेरपरीक्षेत तिला १६६ गुण मिळाले, मात्र कट-ऑफ १७७ असल्याने ती काही गुणांनी अपात्र ठरली. त्याचाच तिला मोठा मानसिक धक्का बसला होता.”
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की “उपलब्ध माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक सखोल तपास सुरू आहे.”







