

जामखेड पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, १६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
जामखेड प्रतिनिधी, दि. २२ जुलै
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथिल अवैध वाळू वाहतुकीविरोधात जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत चार ट्रॅक्टर-ट्रॉलींसह एकूण १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुर्दर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पो. ना रविंद्र वाघ, पो. कॉ योगेश ढवळी व पो. कॉ. ज्ञानेश्वर बेलेकर यांनी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पिंपरखेडे गावच्या शिवारात, पिंपरखेडे ते बावी जाणाऱ्या रस्त्यावर चार ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी धाड टाकून चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

चौकशीत चालकांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली त्या प्रमाणे शाकीर हुसेन शेख (वय ३५ वर्षे), अर्जुन बलभीम लबडे (वय ४२ वर्षे), रामदास नवनाथ कदम (वय ३५ वर्षे),
व अंगद सर्जेराव कदम (वय ३२ वर्षे), सर्व. रा. पिंपरखेड, ता. जामखेड जि. अहिल्यानगर अशा चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत आरोपींकडून १६ लाख २० हजार रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर-ट्रॉली व त्यामधील ०४ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश ढवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने चारही आरोपींची सध्या जामिनावर मुक्तता केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे हे करीत आहेत.

जामखेड तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पिंपरखेड परिसरात जामखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार ट्रॅक्टर-ट्रॉलींसह १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तर दुसरीकडे अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले आहे.










