


जवळके येथे शेतकऱ्याच्या घरात दिवसाढवळ्या घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास
सोयाबीन खुरपणीसाठी शेतात गेलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळके येथे दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली. सोयाबीन पिकाच्या खुरपणीसाठी शेतात गेलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाट फोडून त्यामधील ५० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे.

याप्रकरणी अभिमान अर्जुन बोराडे (वय ३५, रा. जवळके, ता. जामखेड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता ते व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून सोयाबीन पिकाच्या खुरपणीसाठी शेतात गेले होते. दुपारी साडेदोनच्या सुमारास त्यांच्या भावजय समृद्धी वर्धमान बोराडे यांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली.
माहिती मिळताच बोराडे दाम्पत्य तातडीने घरी पोहोचले. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता गोदरेज कपाटाचे दार धारदार हत्याराच्या सहाय्याने फोडण्यात आले होते. कपाटातील लॉकर उघडून त्यामधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या ऐवजात ५० हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकरी कामानिमित्त घराबाहेर असताना घरांची सुरक्षा हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.








