


पेट्रोलपंप डिलरशिपच्या आमिषाने जामखेडच्या व्यावसायिकाची ८४.५३ लाखांची ऑनलाइन फसवणूक
प्रोसेसिंग फी, परवाना व प्रशासकीय शुल्कांच्या नावाखाली उकळले लाखो रुपये; दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा
जामखेड प्रतिनिधी
पेट्रोलपंपाची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत जामखेड येथील एका व्यावसायिकाची तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रोसेसिंग फी, परवाना, सिक्युरिटी डिपॉझिट, कागदपत्रांची पडताळणी तसेच विविध प्रशासकीय शुल्कांच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्या. मात्र, अखेर पेट्रोलपंपाची डिलरशिप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी बुधवारी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदय गुलाबराव शिंदे (वय ५४, रा. रामेश्वर एजन्सी, मार्केटयार्डसमोर, बीड रोड, जामखेड) यांचे जामखेड येथे कृषी सेवा केंद्र आहे. आरोपी सौरभ अग्रवाल व शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी फिर्यादींशी संपर्क साधून ‘जिओ’ कंपनीचा पेट्रोलपंप उभारण्यासाठी अधिकृत डिलरशिप व परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्यासाठी कंपनीकडून मंजुरी मिळविणे, प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, कागदपत्रांची छाननी, परवाना शुल्क तसेच विविध प्रशासकीय प्रक्रियांसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगत आरोपींनी वेळोवेळी मोठ्या रकमेची मागणी केली. डिलरशिप निश्चित मिळणार असल्याचा विश्वास निर्माण करून त्यांनी फिर्यादींकडून विविध बँक खात्यांमध्ये तसेच ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे जमा करून घेतले.

ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादी उदय शिंदे यांनी आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये एकूण ८४ लाख ५३ हजार रुपये जमा केले. एवढी मोठी रक्कम भरूनही ना पेट्रोलपंपाची डिलरशिप मिळाली, ना अधिकृत परवाना मिळाला. उलट आरोपींकडून सतत टाळाटाळ केली जात असल्याने फिर्यादींना संशय आला.
त्यानंतर त्यांनी स्वतः चौकशी केली असता संपूर्ण व्यवहार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींनी वापरलेली बँक खाती, ऑनलाइन व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही कंपनीची डिलरशिप, फ्रँचायझी किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी रक्कम भरण्यापूर्वी संबंधित कंपनीकडून अधिकृत पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया, फोन किंवा ई-मेलद्वारे मिळणाऱ्या आकर्षक ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









