


खर्डा ग्रामपंचायतीचे विभाजन करा; सभापती प्रा. राम शिंदे यांचे ग्रामविकास सचिवांना तातडीने निर्देश!
जामखेड प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खर्डा समूह ग्रामपंचायतीच्या विभाजनाच्या प्रश्नाला अखेर मोठी गती मिळाली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालत खर्डा ग्रामपंचायतीचे तात्काळ विभाजन करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना दूरध्वनीवरून दिले आहेत. या निर्णयामुळे खर्डा परिसरातील सहा गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

खर्डा समूह ग्रामपंचायतीअंतर्गत नागोबाची वाडी, मुंगेवाडी, दरदवाडी, पांढरेवाडी, गितेवाडी आणि गावठाणवाडी ही गावे येतात. मोठी लोकसंख्या आणि विस्तीर्ण कार्यक्षेत्र असल्यामुळे मुख्य गावाव्यतिरिक्त इतर वाड्या-वस्त्यांच्या विकासावर मर्यादा येत होत्या. परिणामी अनेक शासकीय योजना आणि विकासनिधीपासून ही गावे वंचित राहत होती. त्यामुळे विकासाचा अनुशेष सातत्याने वाढत गेला. या प्रश्नाबाबत संभाजीनगर उच्च न्यायालयात (हायकोर्ट) याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर १२ जुलै रोजी नागोबाची वाडी, गावठाणवाडी, गितेवाडी, पांढरेवाडी, मुंगेवाडी आणि दरदवाडी येथील ग्रामस्थांनी सभापती प्रा. राम शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. ग्रामस्थांनी आपल्या अडचणी आणि भावना मांडत खर्डा ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले.
ग्रामस्थांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी कोणताही विलंब न करता तेथूनच ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. खर्डा ग्रामपंचायतीच्या विभाजनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आणि कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सभापतींच्या या हस्तक्षेपामुळे आता खर्डा परिसरात प्रशासकीय फेरबदल होऊन तीन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार खर्डा गाव स्वतंत्र ग्रामपंचायत राहणार असून, दरदवाडी, पांढरेवाडी, गितेवाडी आणि गावठाणवाडी या गावांची दुसरी स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावित आहे. तसेच नागोबाची वाडी आणि मुंगेवाडी या दोन गावांची तिसरी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

या विभाजनामुळे तिन्ही ग्रामपंचायतींना शासनाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध होणार असून रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला न्याय मिळाल्याने सर्व वाड्या-वस्त्या आणि सहा गावांतील ग्रामस्थांनी सभापती प्रा. राम शिंदे यांचे जाहीर आभार मानले. निर्णयाचे स्वागत करत ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.








