


फक्राबाद येथील दरोड्याचा उलगडा; जामखेड पोलिसांची जलद कारवाई, आरोपी जेरबंद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे घडलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा जामखेड पोलिसांनी अल्पावधीत यशस्वी उलगडा करत मुख्य आरोपीसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून जामखेड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 मे 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास फक्राबाद येथील कोरबाई आप्पासाहेब आव्हाड यांच्या घरासमोर झोपलेल्या कुटुंबावर अज्ञात आरोपींनी हल्ला चढवला. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून दहशत निर्माण केली. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करून आरोपी पसार झाले.

या घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागे कुणाल राजू भोसले (रा. राशीन, ता. कर्जत) याच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी राशीन परिसरात सापळा रचून मुख्य आरोपीसह दोन बालकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी इतर चार ते पाच साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. या कबुली जबाबानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे. तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालाच्या जप्तीसाठी आणि फरार आरोपींच्या अटकेसाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, रविंद्र वाघ, योगेश दळवी, दीपक बोराटे, जिब्राईल शेख, गणेश ढोबळे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करून आरोपींना जेरबंद केल्यामुळे जामखेड पोलिसांचे नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.





