


नायगाव अतिक्रमण लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे नायगाव येथील श्रीनाथ मंदिर परिसरातील व ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत टपऱ्या, दुकाने व इतर अतिक्रमणे तात्काळ हटवावीत या मागणीसाठी नायगाव येथील उपोषणकर्ते युवराज अर्जुन गायकवाड यांचे पंचायत समिती कार्यालयासमोर सुरु असलेले आमरण उपोषण गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या अश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र लवकर अतिक्रमण निघाले नाही तर पुढील आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा युवराज गायकवाड यांनी दिला आहे.

नायगाव येथील रहिवासी असलेले युवराज गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना देखील याबाबत निवेदन दिले होते. जामखेड तालुक्यातील नायगाव येथील श्रीनाथ मंदिर व ग्रामपंचायत हद्दीत काही अतिक्रमण धारकांनी अनधिकृत टपऱ्या, दुकाने व इतर अतिक्रमणे करून जागा अडवून ठेवली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून ग्रामपंचायत प्रशासन या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही युवराज गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केला होता. तसेच संबंधित अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायती कडून मदत केली जात असल्याचा आरोप करत सदर अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

मात्र प्रशासनाकडून कसलीही कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर नायगाव येथील उपोषणकर्ते युवराज गायकवाड यांनी बुधवार दि. २० मे २०२६ रोजी पंचायत समिती, जामखेड कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. अखेर या उपोषणाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव उपोषणाच्या ठीकाणी भेट दिली. तसेच लवकरात लवकर घटनेची सर्व माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गावाची हद्द निश्चित करुन अतिक्रमण धारकांना नोटीसद्वरे अतिक्रमण काढण्याच्या कारवाई करण्यास विलंब लागण्याची शक्यता ग्रुहीत धरुन पुढील पंचवीस दिवसात अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन नायगाव ग्रामपंचायतचे अधिकारी के. आर टकले यांनी देखील दिले आहे. आखेर लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्ते युवराज गायकवाड यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे. तसेच जर अतिक्रमण धारकांवर तातडीने कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.





