

मोहरी धरणाच्या दुरुस्तीला वेग; समितीकडून पाहणी, तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील मोहरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या गंभीर अवस्थेच्या पार्श्वभूमीवर धरण सुरक्षा आढावा समितीने आज प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचा सखोल आढावा घेतला. या पाहणीनंतर धरणाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे येत्या अडीच ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

धरण सुरक्षा आढावा समितीचे चेअरमन दिपक मोडक, सदस्य ईश्वर चौधरी (दोघेही निवृत्त मुख्य अभियंता) व शिवाजी बोलभट (निवृत्त अधिक्षक अभियंता) यांनी आज मोहरी तलावाला भेट देत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त भराव व सांडव्याची प्रत्यक्ष मोजमाप करून परिस्थितीचा तांत्रिक आढावा घेण्यात आला.
या पाहणीदरम्यान जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, कुकडी पाटबंधारे विभाग प्रकल्प क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे तसेच स्थानिक लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रखरखत्या उन्हात एक तासाहून अधिक काळ अधिकाऱ्यांनी स्वतः तलावातील नुकसानग्रस्त भागाची तपासणी केली.

यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
पाहणीनंतर मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी धरणाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम तातडीने हाती घेऊन अडीच ते तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच धरण सुरक्षा आढावा समितीचे चेअरमन व सदस्यांनी पाहणी अहवाल व आवश्यक उपाययोजनांचा आराखडा लवकरात लवकर सादर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही पाहणी व पुढील कार्यवाही शक्य झाल्याचे मानले जात आहे. मोहरी धरणावर जामखेड तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा व शेती अवलंबून असल्याने हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा आहे.
पाहणीनंतर समितीने धाराशिव जिल्ह्यातील तिंत्रज प्रकल्प तसेच जामखेड तालुक्यातील नायगाव प्रकल्पाचीही पाहणी केली. त्यामुळे परिसरातील इतर प्रकल्पांच्या दुरुस्ती व सुरक्षेबाबतही लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



