

गोळीबारात जखमी झालेला सागर मोहळकरचा आखेर उपचारादरम्यान मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
गुन्हेगारी प्रवृत्तीचा आसलेल्या सागर मोहळकर याच्यावर शहरातील नुरानी कॉलनी रस्ता या ठिकाणी मोटारसायकलवर आलेल्या तीन ते चार जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी एकुण चार जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सागर मोहळकर याच्यावर पुणे येथील ससुन रुग्णालय या ठिकाणी गेल्या बारा दिवसांपासुन उपचार सुरू होते. अखेर आज दि १६ मार्च रोजी सायंकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दि ४ मार्च रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सागर मोहळकर हा शहरातील नुरानी कॉलनी रोड येथुन पायी चालला होता. यावेळी त्याच्यावर मोटारसायकलवर आलेल्या तीन ते चार जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात सागर मोहळकर यांच्या शरीरात चार ते पाच गोळ्या असल्याचे डॉक्टरांच्या तपासणी मध्ये आढळून आले होते. गोळीबारात मोहळकर गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तातडीने जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन अहिल्यानगर व पुढे पुणे येथील ससुन रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान सागर मोहळकर याच्या शरीरातून डॉक्टरांनी दोन गोळ्या शस्त्रक्रिया करून काढल्या होत्या तर तीन गोळ्या त्याच्या शरीरात होत्या. मात्र त्याची ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने पुढील शस्त्रक्रिया करण्यास आडचणी येत होत्या. अखेर आज सोमवार दि १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ससुन रुग्णालयात या ठिकाणी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा तपास करीत असताना दि ९ मार्च रोजी जामखेड तालुक्यातील झिक्री गावच्या शिवारातुन आरोपी अभिमन्यु महादेव पोते वय 24 वर्षे, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यास पकडण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गुन्हा माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड, पुणे (फरार), रोहित विठ्ठल आखाडे रा. कोथरुड पुणे (फरार), चिन्या पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड पुणे (फरार), यांनी केला असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी एकुण चार जणांनवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सध्या अभिमन्यु महादेव पोते यास पोलिसांनी अटक केली आसुन तीन जण अद्याप फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करित आहेत.








