शहरातील राष्ट्रीय महामार्गालगतची अतिक्रमणे काढावीत; अवधूत पवार यांचे आमरण उपोषण सुरू

जामखेड (प्रतिनिधी)

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी लगतची अतिक्रमणे व विविध अनियमिततांबाबत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी आज, दि. २४ फेब्रुवारी २०२६ पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठींबा वाढत असून प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी लगतच्या पक्क्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, जिओ-टॅगिंगमधील संभाव्य फेरफार आणि वीज वितरण कंपनी (महावितरण) यांच्या विद्युत खांबांमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती याबाबतही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या संदर्भात काही दिवसांपूर्वी निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन सादर करण्यात आले होते. तसेच दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी उपजिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनाही सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.

मात्र प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे अवधूत पवार यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहाजी काका राळेभात, माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात,नगरसेवक वसीम सय्यद, पवन राळेभात, युवक काँग्रेसचे सचिव राहुल उगले, नगरसेवक प्रशांत राळेभात, संतोष गव्हाळे, सोहेल काझी,

दिक्षा फाऊंडेशनच्या सौ.सुरेखा सदाफुले,रंगनाथ राळेभात, संभाजी मुळे, दिपक घायतडक, हनुमंत मोरे, अनिल सदाफुले, गोकुळ जगदाळे, ॲड. ऋषिकेश डुचे, कुंडल राळेभात, उमेश राळेभात यांच्यासह अनेक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.दरम्यान, या उपोषणावर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण व अनियमिततेबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here