निवेदन देऊनही जामखेड शहरातील अतिक्रमणांवर कारवाई नाही

दि २४ फेब्रुवारीपासून अवदुत पवार बसणार आमरण उपोषणास

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतच्या अतिक्रमण व विविध अनियमिततेबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी जाहीर केले आहे. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना सादर करण्यात आले आहे.

जामखेड शहर हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतची पक्की अतिक्रमण, रस्त्याच्या कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा, जियो-टॅगिंगमधील संभाव्य फेरफार तसेच महावितरणच्या विद्युत खांबांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत
यापूर्वी दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष आणि परिणामकारक कारवाई न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

प्रमुख मागण्या

१.राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतच्या जामखेड शहर हद्दीतील सर्व अतिक्रमणांवर नियमानुसार व निष्पक्ष कारवाई करावी.
२.रस्त्याच्या कामाबाबत स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमावी.
३.डीपीआर, जियो-टॅगिंग नोंदी व प्रत्यक्ष मोजणीची सखोल पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी.
४.महावितरणच्या विद्युत खांबांबाबत तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करावी.
५.वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ मार्गी लावावी.

महामार्गाचा हा प्रश्न केवळ विकासापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक सुरळीतता आणि प्रशासनाच्या निष्पक्षतेशी संबंधित असल्याचे पवार यांनी नमूद केले. नेहमी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची अतिक्रमणे हटवून पक्की बांधकामे कायम ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here