Home ताज्या बातम्या जामखेड शहरातील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) चे काम निकृष्ट;

जामखेड शहरातील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) चे काम निकृष्ट;

जामखेड शहरातील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) चे काम निकृष्ट;

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रस्त्यावर उतरणार. तहसीलदार यांना दिले निवेदन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) अंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट, नियमबाह्या व संथ गतीने सुरू आहे. याबाबत तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

जामखेड शहरात सध्या नगरपरिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१) अंतर्गत सुरू असलेली गटार व संबंधित सिव्हिल कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची, शासनमान्य अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांचे सर्रास उल्लंघन करणारी व अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आाहे. सदर कामांमुळे जामखेड शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र दर्जाहीन व नियमबाह्य पद्धतीने कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचा संशय निर्माण होत आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंगळवार दि 3 फेब्रुवारी रोजी सकाळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन दिले. आपल्या मागण्यान बाबत म्हंटले आहे की गटार चेंबर व चेंबरची साईज सिमेंट काँक्रीट करताना मंजूर अंदाज पत्रकातील मापदंड व तांत्रकनिकष पाळले जात नाहीत. तसेच कमी दर्जाचे साहित्य वापरून चेंबर बांधले जात आहेत. गटारसाठी पाईप टाकताना जूने सिमेंट रस्ते जेसीबी मशीनने बेदरकारपणे फोडले जात आहेत, यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाच्या मालमत्तेची जाणीवपूर्वक नासधूस करण्यात येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी पाईप टाकल्यानंतर खोदलेली ठिकाणे दीर्घकाळ बुजविली जात नाहीत, कामे अर्धवट सोडून दिल्यामुळे नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडी, धूळ-चिखल व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गटार लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरूस्ती मंजूर अंदाजपत्रका नुसार व गुणवत्ता पूर्ण पद्धतीने करण्यात येत नाही, ज्यामुळे रस्ते अधिकच खराब झाले आहेत. एका चेंबरपासून दुसर्‍याच्या चेंबरपर्यत टाकण्यात येणारे पाइप हे आवश्यक दर्जाचे, व जाडीचे नसत्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये आढळून येत आहे. सदर कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, हीच परिस्थिती कायम राहिल्यास ठरवून दिलेल्या कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण होणार नाही, हे स्पष्ट आहे. यांचा थेट त्रास जामखेड शहरातील हजारो नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी करूनाही संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

सदर कामांची तात्काळ तांत्रिक व आर्थिक चौकशी करावी, ठेकेदार व संबंधित अधिकान्यांबर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी, निकृष्ट काम तात्काळ थाबवून नवीन मोजमाप व दर्जेदार पद्धतीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत, शहरातील खोदलेले रस्ते तात्काळ दरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा, प्रशासनाकडून ७ दिवसांच्या आत ठोस व समाधान कारक कार्यवाही न झाल्यास, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व जामखेड शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने जामखेड तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण व तीव्र लोकशाही आंदोलन सरू करण्यात येईल असे देखील तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहाजी (काका) राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, वसीम सय्यद, राजु गोरे, कुंडल राळेभात, माजिद कुरैशी, हरीभाऊ आजबे, अवधुत पवार, इस्माईल सय्यद, निखील घायतड‌क, अमोल गिरमे, सागर सदाफुले, प्रशांत राळेभात, प्रविण उगले, संदीप गायकवाड, अशोक घुमरे, अनिल अडाले, सचिन शिंदे, डॉ. प्रणव राळेभात, प्रविण माकुडे, सागर भोसले, बिलाल शेख, अमर चाऊस, दत्ता डिसले, इम्रान तांबोळी, नासीर सय्यद सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

चौकट

अतिक्रमण हटल्याशिवाय विकास नाही!

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील रखडले आहे. गटार, पाणीपुरवठा, रस्ते सगळी विकासकामे अतिक्रमणामुळे रखडली आहेत. काहींच्या बेकायदेशीर अडथळ्यामुळे संपूर्ण जामखेडकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रश्नी तात्काळ कारवाई करून शहराच्या विकासासाठी रस्ते त्वरित मोकळे करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.

शहाजी (काका) राळेभात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!