

जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता तातडीने पूर्ण करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होणार आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
गेल्या आनेक वर्षांपासून शहरातील जामखेड सौताडा या राष्ट्रीय महामार्गचे काम रखडले आहे. येत्या १० दिवसांच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास किंवा योग्य कार्यवाही करण्यात आली नाही, तर समस्त जामखेडकर नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या काही काळापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची संख्या सातत्याने वाढत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे. रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने विकास प्रक्रियेलाही अडथळा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष प्रा. प्रशांत जालिंदर राळेभात यांच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदार व विभागाला तातडीने आदेश देऊन सदर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यावेळी शहाजी राळेभात, इस्माईल सय्यद, संदीप गायकवाड, निखिल घायतडक, डॉ.कैलास हजारे, सूर्यकांत सदाफुले, अमोल गिरमे, प्रवीण उगले, कुंडल राळेभात, सागर भोसले, लक्ष्मण गोरे, वैजनाथ पोले, बापू कार्ले,दादा महाडिक, इम्रान तांबोळी, रवींद्र आष्टेकर, अमोल लोहकरे, सचिन शिंदे, संदीप साबळे, सागर सदाफुले, संदीप अडाले, मनोज राळेभात, बिलाल शेख, मनोज कार्ले नासिर चाचू सय्यद, गणेश गायकवाड, दादा शिंदे, गजानन ढवळे उपस्थित होते.

निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, येत्या १० दिवसांच्या आत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास किंवा योग्य कार्यवाही करण्यात आली नाही, तर समस्त जामखेडकर नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. 8 या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी व रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकट
ठेकेदारावर कारवाई होणार काय?
जामखेड शहरातील समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. याप्रकरणी आनेक वेळा बैठका झाल्या, आनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे इशारे दिले. मात्र ठेकेदाराच्या या हलगर्जीपणामुळे अद्यापही हे काम होऊ शकले नाही. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. काम सुरू झाले नाही तर ठेकेदारावर काय कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतातरी हे काम होईल का असा प्रश्न नागरीकांना पडला आसुन संबधित ठेकेदाराने पोलीस बंदोबस्तात या रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.



