राशीनमध्ये मध्यरात्री थरार; वाहन तपासणीदरम्यान भरधाव गाडीची धडक, पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्य

कर्जत प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे कर्तव्य बजावत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबल सुदाम पोकळे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला.

सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते चिंचाळा देसुर, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील रहिवासी होते. घटनेच्या वेळी ते राशीन येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात शुक्रवारी पहाटे दोन वाजता पेट्रोलिंग करत वाहन तपासणीची मोहीम राबवत होते. रात्रीच्या वेळी संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू असताना एका भरधाव पिकअप गाडीने या ठिकाणी धाव घेतली.

प्रत्यक्षदर्शींनुसार, पोकळे यांनी दूरवरूनच त्या वाहन चालकाला तपासणीसाठी गाडी थांबवण्याचा इशारा केला होता. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असतानाही चालकाने वेग कमी न करता थेट पोकळे यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने क्षणाचाही विलंब न करता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, त्या पिकअप गाडीत काही अवैध वस्तू होत्या का? चालकाने गाडी थांबवण्यास नकार का दिला? याबाबत विविध तर्कवितर्क आणि उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून, यवत येथे पोलीस पथकाने संबंधित वाहन सीसीटीव्हीच्या माध्यमातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. चालकाची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सुदाम पोकळे यांच्या निधनाने पोलीस दलासह संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद कर्जत पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून तिसरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here