शेवगाव प्रतिनिधी
शिरूर कासार येथील एका सराफ व्यावसायिकाचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला, व त्यानंतर मृतदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार (२० मे) रोजी घडली.
ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सराफ बळी विशाल कुलथे यांच्याशी संपर्क केला. माझे लॉकडाऊनमध्ये लग्न झाले. त्यामुळे जास्त सोन करायचे आहे, असे सांगून ऑर्डर देण्यात आली. तसेच, दुकानातील तयार असलेले सोने घेवून माझ्या दुकानात ये, असे गायकवाड म्हणाला. बळी विशाल कुलथे हा सोने घेवून गायकवाड याच्या सलुन दुकानात गेला. मात्र त्याच ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेवुन गायकवाड याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिस खाक्या दाखवताच तो पोपटासालखा बोलु लागला व गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला ते ठिकाण पोलिसांना दाखवले. हे ठिकाण भातकुडगांव येथील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात होते. दरम्यान, शेवगाव पोलिस, शिरूर पोलिस, महसूल शेवगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. खड्यातून मृतदेह काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी आरोपी केतन लोमटे, शिवाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर गायकवाड फरार असल्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी सांगितले.






