बालसंगोपन योजनेची थकीत रक्कम मिळावी, ‘साऊ एकल महिला समिती’ आक्रमक

जामखेड प्रतिनिधी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची थकीत रक्कम तातडीने वितरित करण्याची मागणी करत ‘साऊ एकल महिला समिती’ व स्नेहालय’ने जामखेडच्या तहसीलदारांना एकल महिला व त्यांच्या मुलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२४ पासून या योजनेची रक्कम मुलांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने अनेक एकल महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील सुमारे १ लाख १० हजार एकल महिलांच्या मुलांना या योजने अंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही रक्कम मिळाली नसल्यामुळे पुस्तके, वह्या, गणवेश आणि फी भरण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाकडून निधीच्या कमतरतेचे कारण दिले जात असल्याचा आरोपही समितीने केला आहे. यावर तातडीने कार्यवाही करून थकीत रक्कम तात्काळ वितरित करण्याची मागणी समितीने केली आहे. अन्यथा, ‘साऊ एकल महिला समिती’ तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे.

थकीत रक्कम तात्काळ वितरित करावी, शिष्यवृत्ती दर महिन्याला नियमितपणे जमा करावी, एक-दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ मंजूर करावेत आणि लाभ अर्ज केल्याच्या दिनांकापासून मिळावा, अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन करावी, लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया वेगवान करावी. अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या योजनेमुळे गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलांचे भविष्य घडण्यास मदत होते त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नम्र विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रति महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, अहमदनगर जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर साऊ एकल समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद, योगेश अब्दुले, प्रतिभा धेंडे, प्रहारचे नय्युम सुभेदार, अनिता ढोले, सरस्वती शिरोळे, अंजली आढाव, अंजुम पठाण, उषा खवळे, शबाना इनामदार, सचिन टाक, सूर्यकांत सदाफुले, मनीषा जावळे आदी एकल महिला व सामाजिक कार्यकर्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here