नियतीचा घाला.. लग्नाच्या सात दिवस आधीच जामखेडच्या खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरचा अपघातात मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नाहूली येथील एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात या तरुण खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरचे सात दिवसांवर लग्न आलं असतानाच त्याचा जामखेड-खर्डा रोडवर ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या आपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होतं. दि 23 मे रोजी म्हणजे सात दिवसांवर लग्न आल्याने घरात लग्नाची तयारी आणि आनंदाचं वातावरण होतं. तेवढ्यात काळाने आपला घाला घातला, याबाबत अधिक माहिती अशी की मयत पशुवैद्यकीय डॉक्टर प्रल्हाद जाधव (वय २४) रा. नाहुली हा आज शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी जामखेड वरून जनावरांची औषधे घेऊन आपल्या नाहुली गावी चालला होता. या दरम्यान खर्डा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना आपघात होऊन पशुवैद्यकीय डॉक्टर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला ताबडतोब उपचारासाठी जामखेड येथील खाजगी दवाखाना घेऊन गेले मात्र पुर्वीच त्याचा मृत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉ. जाधव हा दोन वर्षांपासून मुक्या प्राण्याची सेवा करत होता. दोन वर्षापासून तो खाजगी पशुवैद्यकीय डॉ. म्हणून परिसरात प्रसिद्ध होता. जामखेड तालुक्यातील नाहुली येथील प्रल्हाद जाधव याने काही दिवस जामखेड शहरातील एका मेडिकल मध्ये नोकरी केली होती. यानंतर दोन वर्षांपूर्वी व्हिटरनरी कोर्स केला व व्यवसाय सुरू केला. आत्यंत गरीब परिस्थितीत त्याने व्यवसायात चांगला जम बसवला होता.
डॉ. प्रल्हाद जाधव यांचे येत्या २३ रोजी लग्न होते घरात लग्नाची तयारी चालली होती. आणी नियतीने जाधव कुटुबियांवर अघात केला आहे. डॉ. जाधव यांच्या मागे आई वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. सध्या जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष कोपनर करत आहेत.