

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महीलांना पिकअप गाडीने उडवले, एका महीलेचा मृत्यू तर दुसरी महीला गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
खर्डा येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महीलांना खर्डा – भुम रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ पीकअप ने जोराची धडक दिली. या अपघातात एक महीला जागीच ठार झाली तर दुसरी महीला गंभीर जखमी झाली आहे. यानंतर खर्डा पोलिसांनी पिकअप चालकाचा सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे तपासणी करुन त्यास मिरजगाव येथून गाडीसह ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की खर्डा येथील स्मिता दिलीप रणभोर व वर्षा प्रकाश दिंडोरे या दोघीजणी रविवार दि 27 रोजी पहाटे फिरण्यासाठी खर्डा-भूम रोडला चालत होत्या. त्यावेळी त्या पुन्हा माघारी खर्ड्याकडे येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकप M H -14 – M H 0135 या गाडीने रणभोर व दिंडोरे या दोन महीलांना पाठीमागून धडक दिली.

यामध्ये स्मिता रनभोर यांचा जागेवरच मृत्यू झाला तर शेजारी चाललेल्या त्यांच्या सहकारी दिंडोरे यांनाही वाहनाची धडक बसली व त्या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या या घटनेत त्याही गंभीर जखमी असून त्यांना तातडीने अहिल्यानगरला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कै. स्मिता रणभोर अतिशय कष्टाळू महिला म्हणून ओळखले जात होत्या, त्यांचा खर्डा येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या दुःखद निधनाने खर्डा शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हा अपघात झाल्यानंतर पिकप चा ड्रायव्हर याने घटनेवरून पुढे जामखेड मार्गे पलायन केले. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांनी तातडीने तपासाचे चक्रे फिरवून व सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेल्या गाडीचा नंबरचा तपास लावून खर्डा पोलिसांनी त्याला मिरजगाव येथून गाडीसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत.






