उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार आज जामखेड दौर्यावर
विधानसभा निवडणूक निकालानंतरचा कर्जत जामखेड मतदारसंघात पहिलाच दौरा
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची धुरा सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असून रोहित पवार हे येथील आमदार आहेत. अशातच जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची एंट्री आज जामखेड मध्ये होणार आहे. त्याला कारण ठरलं आहे ते शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे. निकालानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच जामखेड मतदारसंघात भव्य कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी सभापती प्रा राम शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून साजरी होत असलेल्या शिव, फुले व आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. याच अनुषंगाने शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दि 17 एप्रिलला जामखेड दौर्यावर येणार आहेत. यावेळी अजित दादांच्यासोबत सभापती राम शिंदे यांची देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम शिंदे यांनी अजित पवार जाणीवपूर्वक जामखेडला सभेसाठी आले नसल्याचा गंभीर आरोप केला होता. यावेळी त्यांनी बोलताना काका-पुतणे एकच आहेत असा गंभीर आरोपही केला होता. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्या लढत झाली होती. या लढतीत रोहित पवार यांचा निसटता विजय मिळवला होता. यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास, असे म्हटले होते.
यावरून राम शिंदे यांनी कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले, म्हणजे हा सुनियोजित कट होता, असा आरोप राम शिंदे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर निकालानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच जामखेड मतदारसंघात भव्य कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा व बेरोजगाराचा प्रश्न सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी सोडवावा अन्यथा जामखेडच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा इशाराही अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी मागील महिन्यात जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ कार्यक्रमात दिला होता. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जामखेड येथील दौर्यावर येत आहेत. या प्रश्नावर अजित पवार काय बोलणार कींवा जामखेड तालुक्यातील एमआयडीसी व कुकडीच्या पाण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलणार का? याकडे जामखेड करांचे लक्ष लागले आहे.