जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे उसाहे पीक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दिनांक 27 मार्च रोजी खर्डा बस स्थानक समोर शिर्डी – हैदराबाद राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले.

याप्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे म्हणाले की, जोपर्यंत खैरी मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे या परिसरातील हजारो टन ऊस पाण्याच्या प्रतीक्षात आहे जर वीज बंद ठेवली उभ्या पिकाला पाणी देता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून याचा खर्डा बाजारपेठेवर मोठा आर्थिक परिणाम होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाने आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी खैरी मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी प्रकल्पात आज रोजी १६०.५१ द.ल.घ.फु. उपयुक्त पाणीसाठा व मृत ४८.३८ द.ल.घ.फु.आहे तर एकूण२०८.८९ द.ल.घ.फु. एकूण पाणीसाठा आहे, तसेच सध्या खैरी प्रकल्पात आजची पाण्याची ३३.०८ टक्केवारी असल्याचे सांगितले.

हे रास्ता रोको आंदोलन चिघळत असताना खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी मध्यस्थी करून जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना फोन करून माहिती दिली, त्यावेळी बोलताना तहसीलदार साहेब म्हणाले की, आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या विनंती अर्ज व भावना मी प्रांतसाहेब कर्जत यांना यांच्यासमोर समक्ष ठेवून चर्चा करतो, व पुढील मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आपण सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी मोबाईल द्वारे संभाषण करून केले. यावेळी शेतकऱ्यांनी सोमवार पर्यंत मार्ग काढण्याचे तहसीलदार यांना सांगितले, तसेच तोपर्यंत या परिसरात वीज कर्मचारी पाठवू नये अशी विनंती त्यांनी केली.

त्यानंतर खैरी प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे, सर्कल संतोष नवले, तलाठी विकास मोराळे भाऊसाहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या उपस्थितीत हे रास्ता रोको आंदोलन एक तासानंतर मागे घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, दत्तात्रय भोसले, चंद्रकांत गोलेकर, शिवाजी भोसले, कल्याण सुरवसे, श्रीकांत लोखंडे, आजिनाथ लटके, शंकर गुळवे, गणेश लटके, राजेंद्र भोसले, दादा शिकारे, नाना शेळके, आबा केसकर, पांडुरंग भोसले, काका शेळके, अण्णा सावंत, इत्यादी सह बहुसंख्य परिसरातील शेतकरी या रास्तारोको आंदोलनात उपस्थित होते.

चौकट

पोलिसांची कार्यतत्परता.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी खर्डा बसस्थानका समोरील शिर्डी- हैदराबाद राज्य मार्गावर रास्तारोको आंदोलन केले, परंतु पोलिसांनी तुळजापूरकडे जाणाऱ्या गाड्या जातेगाव चौकातून शुक्रवार पेठ मार्ग रस्त्याने वळविण्यात आल्या तर जामखेडकडे जाणारी वाहने मार्केट कमिटी मार्गे जातेगाव चौकातून पुढे पाठविण्यात त्यांना यश आले त्यामुळे या रास्तारोको आंदोलनाचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका न बसता प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here