जामखेड सौताडा रस्त्याचे काम रखडले, अपघातास कारणीभूत ठेकेदार व कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-काकासाहेब गर्जे
अन्यथा 3 मार्च 2025 पासून तहसील कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण
जामखेड ते सौताडा या रस्त्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून काम रखडले आहे. रस्त्याची खूपच दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसून नसून दुभाजकाला रेडियम लावले नसल्याने एका पोलीस कर्मचारी व व्यापाऱ्याच्या गाडीचा आपघात होऊन या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातास कारणीभूत असलेल्या संबंधित ठेकेदार व कंपनी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा दिनांक 3 मार्च 2025 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा जामखेड चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब गरजे यांनी दिला आहे.
जामखेड ते सौताडा या रस्त्याचे गेल्या एक वर्षापासून काम रखडले आहे. कधी काम सुरू होते तर कधी अचानक बंद पडते त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याच अनुषंगाने जामखेड बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब गर्जे यांनी जामखेड चे तहसीलदार यांना नुकतेच निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या बीड रस्त्याचे काम चालू आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे या ठिकाणी रस्त्यावर सध्या कसल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत, तसेच कुठल्याही प्रकारे रेडियम लावण्यात आलेले नाही यामुळे बीड रोडवर वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
बीड रोडवरील बसवण्यात आलेल्या दुभाजकाच्या ठिकाणी रेडियम लावले नसल्याने या ठिकाणी एका पोलीस कर्मचारी व व्यापारी यांच्या गाडीचा दोन दिवसांपूर्वी अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व कंपनीवर कामात हलगर्जीपणा केल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा 3 मार्च 2025 पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब गर्जे यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन नुकतेच तहसीलदार यांना दिले असून यावेळी माझी नगरसेवक गणेश आजबे व ऋषिकेश बांबरसे हे देखील उपस्थित होते.