देवदैठण येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; महीला व ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांची संयुक्त कारवाई
देवदैठण येथील चार अवैध दारूविक्री दुकानांवर कारवाई
जामखेड प्रतिनिधी
देवदैठण येथे अवैद्य दारु विक्री होत असल्याने महीलांनी गावातील दारूविक्री बंद करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र गावातील दारू विक्रीचे दुकानावर कारवाई होत नव्हती आखेर आज सकाळी देवदैठण येथील महीलांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थ व पोलीसांच्या मदतीने अवैद्य दारु पकडुन दिली. याप्रकरणी खर्डा पोलिसांनी चार जणांनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले होते. याचा त्रास गावातील महीलांना मोठ्या प्रमाणात होत होता. या प्रकरणी देवदैठण येथील महीलांनी गावातील अवैद्य दारूविक्रीची दुकाने बंद करुन कारवाईसाठी करण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीला गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला होता. तसेच गावातील दारुची दुकाने बंद करण्यात यावी याबाबत काही लोकांनी निवेदन देखील दिले होते. मात्र पोलिसांन कडुन तात्पुरती कारवाई होत होती. मात्र काही दिवसांनी पुन्हा गावात दारु विक्री होत होती. यामुळे महीलांसह ग्रामस्थ देखील संतप्त झाले होते.
आज रविवार दि २३ रोजी सकाळी गावातील महीला ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमा झाल्या अवैद्य दारु विक्री विरोधात आक्रमक होत आवाज उठविला यावेळी गावातील सरपंच उपसरपंच यांच्या सह ग्रामस्थांनी अवैद्य दारु ज्या ठिकाणी विक्री होती त्या ठिकाणी पाळत ठेवली यानंतर गावातील ग्रामस्थांनी खर्डा पोलीसांना याची माहिती दिली. खर्डा पोलीसांनी सिव्हिल ड्रेसवर गावात येऊन महिला व ग्रामस्थ यांनी संयुक्त मोहिम राबवत अवैध दारू विक्रेते यांच्या दुकानांवर धाड टाकत देशी, विदेशी जवळपास साडेबारा हजार रुपयांचा मु्दमाल हस्तगत केला आहे. तसेच ग्रामस्थांनी अनेक बॉक्स मधील दारू बाटल्या फोडून टाकल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कचरू बाजीराव जावळे वय ४५ वर्ष, विष्णू राजेंद्र उगले वय २९ वर्ष, साहेबराव लक्ष्‍मण भोरे वय ६७ वर्ष, साहेबराव श्रीपती महारनवर वय ७८ वर्ष, सर्व रा. देवदैठण ता. जामखेड यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आली असून सदरचे त्यांच्या कडून एकूण १२ हजार ३५५ रुपये किंमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच वरील चार जणांनविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील घटनेचा तपास सपोनि विजय झंजाड सह खर्डा पोलीस करत आहेत.
चौकट
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे अवैद्य धंदे सुरू आहेत. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर क्लब सुरू आहेत, तसेच मटका, जुगार, देशी दारू, अवैद्य हॉटेल, क्लब सुरू असताना देखील पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. आता देवदैठण येथील अवैद्य दारू विक्री कारवाई नंतर आता खर्डा हद्दीतील अवैद्य धंद्यांवर खर्डा पोलीस करणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here