अनाथ मुलांचे भविष्य घडवण्याचं काम निवारा बालगृह करते – तहसीलदार गणेश माळी
जामखेड (प्रतिनिधी)
सामाजिक काम उभा करणं सोपं आहे परंतु हे काम करत असताना समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे व या कामात सातत्यं ठेवणं गरजेचं आहे, आणि हे सातत्य मला या निवारा बालगृह संस्थेमध्ये दिसत आहे. अनाथ मुलांचे भविष्य घडवण्याचं काम निवारा बालगृह करते असे मत तहसीलदार गणेश माळी यांनी व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निवारा बालगृह या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील सर्व शाळांमधून डान्स स्पर्धेचे आयोजन करून निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता- जामखेड जि – अहिल्यानगर याठिकाणी निवारा महोत्सव-२०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तहसीलदार गणेश माळी बोलत होते.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सव जामखेडचे तहसीलदार मा. गणेश माळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव साहेब, डॉ. सचिन काकडे, महादेव बांगर सर, प्रा.आप्पा शिरसाट, संतोष हापटे सर ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापूसाहेब ओव्होळ, सचिव उमाताई जाधव, विशाल पवार, भिमराव चव्हाण, अशोक साळवे, अमोल सातपुते, श्रीकृष्ण अटक, द्वारकाताई पवार, नीता इंगळे, यावेळी आदी मान्यवर विचारपीठावर मंचावर उपस्थित होते.
संस्थेने जामखेड तालुक्यातील अनेक शाळा मधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डान्स नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिन भिंगारदिवे, तुकाराम शिंदे, ऋषिकेश गायकवाड, रंजनी बागवान, राहुल पवार, राजु शिंदे,आदींनी परिश्रम घेतले, यावेळी लहान गटामध्ये प्रथम क्रमांक प्रदीप कुमार महादेव बांगर विद्यालय मोहा यांनी मिळवले, द्वितीय क्रमांक निवारा बालगृह समता भूमी यांनी मिळवले, तृतीय क्रमांक विस्डम इंलिश स्कूल जामखेड यांनी मिळवले. तसेच मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्देठण यांनी मिळवले. द्वितीय क्रमांक प्रदीप कुमार महादेव बांगर विद्यालय यांनी मिळवले. तृतीय क्रमांक निवारा बालगृह समता भूमी जामखेड यांनी मिळवला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जामखेड तहसीलचे तहसीलदार मा. गणेश माळी म्हणाले की समता व सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधुन या बालगृहाची स्थापना झाली आहे. म्हणजे हे काम महापुरुषांच्या विचारावरती चालू आहे. संस्थेचे काम हे अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी खूप मोठे आहे, संस्थेच्या कामामध्ये जामखेड तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी सोबत राहातील व पुढील काळामध्ये वंचित घटकासाठी प्रशासन व संस्था मिळुन एकत्र काम करूयात, या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व बाळ-गोपाळांना शुभेच्छा व संस्थेच्या पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देतो.
जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बोलताना म्हणाले की या संस्थेचे शिक्षणावरती तसेच विधवा परित्यक्ता, एकल महिला, भटके- विमुक्त यांच्यावरती जामखेड-कर्जत, श्रीगोंदा या तीनही तालुक्यात खूप मोठे काम चालू आहे हे मी अगोदरच जाणून आहे या ठिकाणी आल्यानंतर येथे प्रसन्न वाटते आबांनी या लेकरांना मायेची उब दिली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपुले या पद्धतीने देव रुपी काम आबांच्या हातून होत आहे. मला माहित नाही इतर लोक कशामध्ये देव पाहतात परंतु आबांनी माणसात देव पाहिला आहे. खरचं आबा तुमच्या कार्याला सलाम करतो तुम्ही या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केला याला मी भरभरून शुभेच्छा देतो व संस्थेच्या पुढील कामासाठी काही मदत लागली तर अगदी बालगृहाचा एक सदस्य म्हणून मला हाक द्यावी.
ॲड.डॉ. अरुण जाधव म्हणाले की, व्यवस्थेने नाकारलेल्या माणसाच्या लढ्याचे नेतृत्व मी करतो. मी एक वाट सरू आहे या सर्व कार्यकर्त्यांचा ही संस्था उभा करण्यामध्ये वाटा आहे. म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगतो सामाजिक काम करणं म्हणजे मान, अपमान, सन्मान याचं गाठोडं बांधून काम करणे. सत्कार मिळो- नमिळो हे काम करत राहावे. वंचित, निराधार, अनाथ आदिवासी, भटके विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवारा बालगृहाची स्थापना केली आहे.