खर्डा येथे कृषिदुतांची मासिक आढावा बैठक संपन्न
जामखेड प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव आयोजित ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत खर्डा येथे कृषिदूतांची प्रथम मासिक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये खर्डा आणि राजूरी या दोन्ही गावचे कृषिदूत उपस्थित होते.

यावेळी बैठकीत दोन्ही गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये घेण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिकांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही गावांमधील विद्यार्थ्यांचे गटप्रमुख सौरभ चव्हाण व संकेत मोहळकर यांनी गावातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांचा आढावा सादर केला तसेच गावातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांबद्दल माहिती दिली. यामध्ये कृषिदूतांनी प्रमुख पिकांमध्ये जैविक पद्धतीने रोग व किड नियंत्रण यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वनस्पती रोग शास्त्र अंतर्गत ज्वारी या पिकाचे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले तसेच मृदा शास्त्र अंतर्गत माती नमुना घेण्याचे, अशी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली.

या मासिक बैठकीसाठी कार्यक्रम समन्वयक व कृषि वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ डॉ. विवेकानंद कुलकर्णी, केंद्रप्रमुख पोपट पवार, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. नजिर तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास मेहेत्रे, सहयोगी प्राध्यापक कृषि विस्तार शिक्षण डॉ. गोकुळ वामन, मृदाशास्त्र विषयतज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ डॉ.मनोज गुड, कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. महेश निकम, कृषि विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. प्रणाली ठाकरे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. निकिता धाडगे, कृषि अर्थशास्त्र विषयतज्ञ डॉ. उत्कर्षा गवारे उपस्थित होते.

प्रत्येक विषयतज्ञांनी आपल्या विषयाचा गावांमधील शेतकऱ्यांना फायदा कसा करून देण्यात येईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिदूत आर्यन देशमुख तर आभार प्रदर्शन शिवम महाडिक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here