900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, 10 ICU ; नारायण गडावरील जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याचा नादच खुळा!
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची व आचारसंहिता लागण्यापूर्वीची शेवटची बैठक संपन्न झाली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही.
त्यात आता लवकरच आचारसंहिता जाहीर होईल. पण, मराठा समाजाला आोबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच दसऱ्याच्या दिवशी जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यात दसरा मेळावा होणार आहे. त्याची तयारी देखील जय्यत झालेली आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सद्या लढा सुरू आहे. वर्षभरापासून हे आंदोलन चालू आहे. तरी देखील सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तर मराठा आंदोलक जरांगे यांच्या मागण्या काही मान्य झालेल्या नाहीत. काही मागण्यांवर सरकारकडून प्रतिसाद दिला गेलेला आहे, पण त्यावर जरांगे पाटील हे समाधानी नाहीत.
जरांगेंच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मेळावा
त्यानंतर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
जरांगे नेमकं काय बोलतील, कोणावर निशाणा?
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे. नारायण गडाच्या एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. मेळाव्यासाठी येणाऱ्या बांधवांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यातील हिट लक्षात घेता पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील पहिल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलतील, आपली भूमिका जाहीर करतील का, राजकीय निर्णय घेतील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मेळाव्यातून मिळणार आहेत. त्यामुळे, राज्यभरातून मराठा बांधव या मेळाव्याला उपस्थिती दर्शवणार आहेत.
500 क्विंटल बुंदी, 100 रुग्णवाहिका असतील तैनात
या मेळाव्यासाठी आतापर्यंत नारायणगडावर जवळपास 500 क्विंटल बुंदीचे गाळप महाप्रसाद स्वरूपात करण्यात आले आहे. दिवस-रात्र भाविकांसाठी मराठा सेवकांचे हात येथे झटत आहेत. जेवणासह महाप्रसाद म्हणून बुंदी तयार केली जातेय. तर, गडाच्या परिसरात असणाऱ्या गावांमध्ये विशेष भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था टँकर आणि बाटल्यांमधून करण्यात आली आहे, नारायण गडावर होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून ज्या सुविधा आयसीयु विभागात दिल्या जातात, त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. येथे येणाऱ्या बांधवांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणार आहे. तर, 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 200 एकरवर पार्किंकची व्यवस्था असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here