पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीला जुलै अखेर मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
आ. रोहित पवार यांचे उपोषण मागे.
जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाचं हत्यार उपसताच सरकारही एक पाऊल मागे आले आहे. जुलै अखेर एमआयडीसीला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना दिल्याने एमआयडीसी साठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरु केलेले उपोषण आमदार रोहित पवार यांनी मागे घेतले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयाचा आमदार रोहित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. एमआयडीसीला तत्वतः मान्यता आणण्यापासून तर जागा पाहणी, ड्रोन सर्व्हे, व्यवहार्यता अहवाल, तांत्रिक समितीची मान्यता हे सर्व टप्पे त्यांनी पूर्ण केले आहेत. सध्या ही फाईल एमआयडीसीची अंतिम अधिसूचना काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या फाईलवरील धूळही झटकली जात नाही आणि केवळ माजी मंत्री आणि विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय दबावामुळे एमआयडीसीची अधिसूचना काढली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
त्यामुळे ही एमआयडीसी मंजूर करण्यासाठी त्यांनी गेल्या चार ते पाच अधिवेशनात वेगवेगळ्या संसदीय आयुधांच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला. गेल्यावर्षी तर विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भर पावसात त्यांनी आंदोलन केले आहे. त्यावेळी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना दिले होते. त्यानंतरही सातत्याने त्यांनी या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवला असता त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली, परंतु त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.