
फक्राबाद, खर्डा व जामखेड दूधभेसळ प्रकरणी आणखी ९ जणांना अटक
अटक आरोपींची संख्या १४, तपासात आणखी नावं येण्याची शक्यता.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत घातक रसायनांचा वापर करून बनावट दूध बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता . बनावट दूध निर्मितीचे रॅकेट उघडकीस आले आहे. आणखी ९ जणांना अटक केली असून प्रकरणात अटक आरोपींची एकूण संख्या १४ वर पोहोचली आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एलसीबीचा पदभार स्वीकारल्यानंतर तपासाला गती आली आणि एका रात्रीत सात संशयितांना पोलिसांनी अटक केली.

एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासन (एएफडीए) विभागाने संयुक्त कारवाई करीत १४ फेब्रुवारी रोजी छापा घालून बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस आणले. तत्कालीन पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग यांनी गुन्ह्याचा तपास करून ४१ संशयित निष्पन्न केले.

गेल्या चार महिन्यात त्यात केवळ ७ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एलसीबीचा पदभार स्वीकारल्यानंतर तपासाला नवी गती मिळाली आणि एलसीबीच्या पथकाने एका रात्रीत वरील सात संशयितांना अटक केली. अटक आरोपींमध्ये हरिदास एकनाथ गोपाळघरे (वय ३४, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड) सद्दाम कमरूद्दीन शेख (वय २९)
चंद्रकांत आण्णा बर्डे (वय ३६, दोघे रा. उंबरे, ता. राहुरी) महेश तुकाराम मोकाटे (वय २५, रा. इमामपूर, ता. अहिल्यानगर) लक्ष्मण पोपट करंजुले (वय ३१, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर) किशोर काशिनाथ पुंड (वय ४६, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) सर्जेराव काशिनाथ म्हसे (वय ४५, रा. शिलेगाव, ता. राहुरी) यांची नावे तपासात असे निष्पन्न झाले आहे, की संशयितांनी बनावट दूध निर्मितीसाठी आवश्यक रसायने, पावडर आणि अन्य साहित्याचा पुरवठा केल्याचे समोर आले आहे. काही संशयितांनी घातक रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री केल्याचे, तर काहींनी त्याचे संकलन व वितरण केल्याचेही समोर आले आहे.

गुन्ह्याच्या तपासात सात जणांविरोधात सुमारे ८५० पानी दोषारोपपत्र जामखेड न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी चौघांना जामीन मिळाला असून तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
नव्या कारवाईनंतर प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे. अद्याप २७ संशयित पसार असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात आणखी अटकसत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या गुन्ह्यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, बनावट दुधाचा ओघळ नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे. जामखेड तालुक्यात खर्डा येथे अनेक ठिकाणी बनावट दूध रॅकेट चालू असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
चौकट
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली. प्रशासनही तत्परता दाखवत आहेत पुढील तपासात जामखेड मधील आणखी काही भेसळ संबंधी माहिती व लोकांची नावं उघड होऊ शकतात.










