रत्नापूर, राजुरी व शिऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला


तीन ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध
जामखेड प्रतिनिधि
निवडणूक आयोगाकडून जामखेड तालुक्यातील माहे डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या रत्नापूर, राजुरी व शिऊर या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादी सदर गावातील लोकांना तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या असून पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


रत्नापूर, राजुरी, शिऊर या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली या मतदार याद्या बाबत हरकत घेण्यासाठी दि. १३ ते १६ आँक्टोबर रविवार वगळून कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयात दाखल कराव्यात. या मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. अश्या सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिल्या आहेत.

जामखेड तालुक्यातील या तिन्ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यापूर्वी सरपंच पदाची निवडणूक जनतेतून झाली होती. तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर ग्रामपंचायत सरपंचपद व नगराध्यक्षपद जनतेतून निवडणूक घेण्याचा कायदा रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा भाजप सेना युती सरकार सत्तेवर येताच त्यांनी विधानसभेत कायदा संमत करुन जनतेतून सरपंचपद व नगराध्यक्ष निवड करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या या शिऊर, रत्नापूर व राजुरी या ग्रामपंचायत निवडणुक गाजणार आहे. तालुकास्तरीय पदासाठी याच गावातील पदाधिकारी असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याने या निवडणूकींना महत्त्व आले आहे.

रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष व युवा नेते डॉ. भास्करराव मोरे, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे व रत्नापूर गावचे माजी सरपंच सुर्यकांत मोरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनंदा वारे व पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय वारे यांचे गाव रत्नापूर आहे. सध्या हे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत यामुळे या निवडणुकीत यांची कस लागणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर यांचे गाव शिऊर आहे सध्या त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत व सेवा संस्था आहे. सरपंच पदासाठी ते स्वतहा इच्छुक आहेत. विरोधक प्रबळ असल्याने निवडणूक अटीतटीची होणार आहे. राजुरी गाव राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आहे. तालुका पातळीवर भाजप व राष्ट्रवादी प्रमुख दावेदार आहेत.






