शेतात औषध फवारणी करताना विषबाधा, उपचारादरम्यान तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; संपूर्ण गाव हळहळलं

शेतकऱ्यांनी शेतात फवारणी करताना काळजी घ्यावी

परभणी : शेतामध्ये गवत झाल्यामुळे तणनाशक फवारत असताना एका शेतकऱ्याला विषबाधा झाली. त्यानंतर शेतकऱ्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना या शेतकऱ्याचा नांदेड येथे गुरुवारी मृत्यू झाला आहे. मुंजाभाऊ आत्माराम गरड असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे अंगलगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात औषध फवारणी करताना काळजी घ्यावी.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील अंगणगाव येथील शेतकरी मुंजाभाऊ आत्माराम गरड यांच्या शेतामध्ये गवत झाल्यामुळे ते शेतात राऊंड अप कंपनीचे तन नाशक फवारत असताना त्यांना विषबाधा झाली. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंजाभाऊ गरड यांना उपचारासाठी गंगाखेड येथे दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले होते. मात्र, नांदेड येथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

एका तरुण शेतकऱ्याचा फवारणी करत असताना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याने अंगलगाव व परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंजाभाऊ गरड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा दोन मुलगी, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने गरड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फवारणी करताना खबरदारी घेणे गरजेचे

शेतीमध्ये फवारणी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना फवारणी करताना खबरदारी घ्यावी असा सल्ला दिला जातो. मात्र, शेतकरी याला गांभीर्याने घेत नसल्याने अशा घटना घडत असतात. जीवितहानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here