मुंबई हायकोर्टाचा शिंदे गटाला झटका, ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी न्यायालयाने दिली परवानगी

मंबई : शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेनं महापालिकेकडे केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने निकाल दिला. शिंदे गटाला झटका बसला असून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.

दसरा मेळाव्यात नेमका कुणाला अनुमती द्यावी या मुद्द्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टात मुंबई महापालिका, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट या तीनही पक्षकारांकडून युक्तीवाद केला. तीनही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली.

पुढे मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेने स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं सांगताना, अर्जावर निर्णय देताना २० दिवसाचा विलंब केला, मात्र अर्ज नाकारताना बीएमसी आणि पोलिसांमध्ये केवळ एकदिवसात घडामोडी घडल्या असं कोर्टाने नमूद केलं. पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं.

दोन्ही अर्जांची कल्पना मुंबई महापालिकेला होती. मुंबई महापालिकेकडे शिवसेनेनं अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचा अहवाल महापालिकेला मिळाला. मात्र, शिवसेनेनं कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी दिली. मात्र, महापालिकेनं अधिकारांचा गैरवापर केला, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here