श्रीगोंदा प्रतिनिधी

बहुचर्चित राजकारणी बाळासाहेब नाहाटा यांचा अनेकवेळा लांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला. राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेश सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजित पवार आज शनिवारी (३ सप्टेंबर) श्रीगोंद्यात येत आहेत.

अजित पवार यांनी नाहाटा यांची राज्य बाजार समिती महासंघ सभापती पदावर केलेली निवड आणि श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होण्यासाठी घातलेले लक्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे आहे. पत्रकार परिषदेत बोलताना नाहाटा म्हणाले होते की, अजित पवार यांनी आपली विनाअट राज्य बाजार समिती महासंघ सभापतिपदी निवड केली. हा माझ्या राजकीय जीवनातील सर्वोच्च बहुमान आहे. बदल्यात आपण आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदे मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीने तुमच्याशी मतभेद असणाऱ्या नेत्याला उमेदवारी दिली तर? कोणती भूमिका घेणार असे विचारता नाहाटा म्हणाले, मी उमेदवार न पाहता राष्ट्रवादीला प्राधान्य देईल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शेतकरी हिताचे काम उल्लेखनीय होते आजही राज्यातील प्रश्न ते पोटतिडकीने मांडतात त्यांचा दौरा पक्षाला ऊर्जा देणारा व मतदार संघातील प्रश्न सुटण्यास फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अजित पवार यांच्या हस्ते मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, तर पारगाव येथील सेवा संस्था इमारतीचे भूमिपूजन, त्यानंतर श्रीगोंदे बाजार समितीच्या आवारात पणन मंडळ योजनेतील गोदामाचे उद्घाटन व नाहाटा यांचा अभिष्टचिंतन, पक्षप्रवेश होणार आहे. याप्रसंगी कुकडी कारखान्याचे कल्याण जगताप, हरिदास शिर्के,बाळासाहेब खेतमाळीस,शांताराम पोटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here