जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे व मोठे गाव असलेल्या घोडेगाव येथील विविध समस्यांबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही या बाबत कोणताही निर्णय होत नसल्याने प्रभू नवनाथ गवळी यांनी सुरू केलेले उपोषण तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या लेखी आश्वासननंर दुसर्‍या दिवशी मागे घेण्यात आले.

घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता कोंक्रिटीकरण हे निष्कृष्ट दर्जाचे आहे. त्याची चौकशी करणे, घोडेगाव हद्दीतील गवळी वस्ती येथील पाण्याच्या टाकिचे बांधकाम करणे, वार्ड क्र . १ मधील अंगणवाडी क्र . २३ चे बांधकाम त्वरित करणे, घोडेगाव येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे २०१८ पासून २ शिक्षक नाहीत तसेच मुलींचे शौचालय नाही. तर येथे दोन शिक्षक पुरवून मुलींसाठी शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच घोडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आवश्यकते नुसार वर्ग खोल्या मंजूर कराव्यात. यासाठी उपोषणकर्ते प्रभु नवनाथ गवळी यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर काल दि. ८ रोजी उपोषण सुरू केले होते. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून घोडेगावबाबत निर्णय घेऊन योग्य उपाययोजना करण्यात येतील तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असेही आश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिले.

घोडगावातील पाणंद रस्ते प्रकरणी उद्या दि. १० रोजी प्रत्येक्ष पाहणी करून निर्णय घेतला जाईल असेही तहसीलदार योगेश चंद्रे यांनी उपोषण कर्ते व उपस्थितांना आश्वासन दिले. यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष नय्युम शेख यांचेही सहकार्य लाभले. उपोषण सोडताना विविध खात्यांचे अधिकारी पोले, इंजिनिअर माने, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी बी. के. माने, ग्रामविस्तार अधिकारी प्रशांत सातपुते व घोडेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here