मुस्लिम बांधवांनी पुकारलेल्या जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा विरोधात देशभर तीव्र निदर्शने केली जात आहे. याचे पडसाद जामखेड तालुक्यातही आज उमटले. जामखेड तालुक्यात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया येत असताना, आता याचे पडसाद स्थानिक पातळीवर सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून तसेच नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी म्हणून आज जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मुस्लिम बांधवांनी पुकारलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जामखेड शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे आपापली दुकाने दिवसभर बंद ठेवली व बंदला पाठिंबा दिला. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली तसेच निवेदनाच्या प्रती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी अहमदनगर व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिले आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्यबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले, तर नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली असली तरी त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या मागणीवर मुस्लिम समाज ठाम आहे. त्यातच आता स्थानिक पातळीवर सुद्धा या प्रकरणाचे पडसाद उमटत आहे.






