कर्जत प्रतिनिधी

राज्यात सकाळ आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात एकाच ठिकाणी दुधाचे संकलन सुरु करावे, यासह राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा देवी देवस्थानची जमीन सरकारी रेकॉर्ड प्रमाणे मोजून त्यास कंपाऊंड करावे, राशीनच्या गट नं १४६२ मधील मूळ खरेदी ४१ गुंठ्याची असताना तिचे अनधिकृतपणे ६५ गुंठे केलेले वाटप रद्द करावे, अवसायनात काढलेली यशोदामैय्या पतसंस्था पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळावी. यासह इतर मागण्यांसाठी जगदंबा डेअरीचे संचालक नारायण जगताप यांनी गुरुवारी (ता.२६) सुरू केलेले उपोषण आज (ता.२) आठव्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास उपोषणकर्ते जगताप यांना दिल्यानंतर आमदार पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी एन.एस.पाटील, श्याम कानगुडे, उपसरपंच शंकर देशमुख, अॅड. युवराज राजेभोसले, मनोज बोरा, दादा परदेशी, रामकिसन साळवे, माऊली सायकर, संकल्प पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार पवार यांनी जगताप यांच्याशी विविध प्रश्नां संदर्भात चर्चा करून जगताप यांचे म्हणणे जाणून घेतले. तहसीलदार नानासाहेब आगळे, सहायक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अखत्यारीत येणारे प्रश्न ते मार्गी लावतील. राज्यात दोन वेळा दुध संकलनाचा विषय सर्व दुग्ध उत्पादक शेतकरी आणि दूध संकलन करणाऱ्या प्रमुख डेअऱ्या चालकांशी बोलून त्यातून योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन आमदार पवार यांनी देऊन दहा जून नंतर याबाबत शेतकऱ्यांच्या बैठका घेऊ असे सांगितल्यावर जगताप यांन आपले उपोषण मागे घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here