अहमदनगर प्रतिनिधी

शिक्षकी पेशाला डाग लावण्याचे काम पाथर्डीतील दोन शिक्षकांनी केले आहे. पाथर्डी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कोविड सेंटर बाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागून वृत्तपत्रात बातम्या छापू अशी धमकी देत, बदनामी न होण्यासाठी अर्ज मागे घेवू त्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांवर संबंधित डॉक्टरांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीत चक्क माध्यमिक शाळेत शिकवणारे दोन शिक्षक आहेत, तर एक संस्था चालक आणि एक एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. या घटनेने पथर्डीत खळबळ उडाली आहे.

दहा लाखाची खंडणी मागून तीन लाखावर तडजोड करण्यात आली होती. त्यापैकी तीन लाख स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पोलिसांनी पाहिले मात्र, पोलीस पकडण्यास येत असल्याचे दिसताच कार मधे बसलेले दोन आरोपी बॅग फेकून फरार झाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव कार चालवत दोन्ही आरोपी फरार झाले तर इतर एका आरोपींना पाथर्डी पोलिसांनी जागेवरच जेरबंद करत एकूण चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी येथील डॉ विनोद त्रिंबक गर्जे यांनी पाथर्डी शहरात कोविड हॉस्पिटल चालवण्या संदर्भात आरोग्य विभागाकडून रीतसर परवाना घेतलेला होता. तसेच फिर्यादी असलेल्या डॉक्टरांनी वेळोवेळी सर्व आकडेवारी ची माहिती आरोग्य विभागाला सादर केलेली आहे.

मात्र याबाबत आरोपी शैलेंद्र जायभाय याने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ नवनाथ आव्हाड यांचे कडे माहिती अधिकारा अंतर्गत गर्जे हॉस्पिटलची माहिती मागवली होती. ही माहिती डॉ गर्जे यांनी परस्पर जायभाय यास कळवण्यास आणि त्याची एक प्रत उपजिल्हा रुग्णालयात लेखी पत्राने देण्यास सांगितले होते. मात्र आरोपी शैलेंद्र जायभाय व नवनाथ उगलमुगले यांनी डॉ गर्जे यांना डॉ आव्हाड यांचे समोर दिनांक १४ जानेवारी रोजी १० लाखांची खंडणी मागितली व रक्कम न् दिल्यास पेपर मध्ये हॉस्पिटलच्या बातम्या देवून बदनामी करत हॉस्पिटल बंद पडण्याची धमकी दिली होती, असे तक्रारीत म्हंटले आहे.

डॉ विनोद गर्जे हे खरवंडी येथे कार्यक्रमा निमित्त २५ जानेवारी रोजी गेली असता आरोपी मिथुन डोंगरे यांने मध्यस्थी करत बदनामी टाळण्यासाठी तडजोडी करत पुन्हा चार लाखांची खंडणी मागितली तडजोडी अंती तीन लाख खंडणी देण्याचे ठरले. याबाबत सरकारी पंचासमक्ष आरोपी शैलेंद्र प्रल्हाद जायभाये रा.खरवंडी ता.पाथर्डी,मिथुन दगडू डोंगरे रा.जवळवाडी ता.पाथर्डी,मछीन्द्र राधाकिसन आठरे रा.आनंदनगर,पाथर्डी यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली स.पो.नी प्रवीण पाटील,पो.स.ई सचिन रणशेवरे,श्रीकांत डांगे,पो.ना.अनिल बडे,देविदास तांदळे,राहुल तिकोने,राम सोनवणे यांच्या पथकाने तनपुरवाडी शिवारात छापा टाकून रंगेहात पकडले परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी शैलेंद्र जायभाय व मिथुन डोंगरे हे वॅग्नोर गाडीतून पळून गेले परंतु आरोपी मछीन्द्र राधाकिसन आठरे यास पोलिसांना पकडण्यात यश आले असून आरोपी शैलेंद्र प्रल्हाद जायभाये रा.खरवंडी ता.पाथर्डी,मिथुन दगडू डोंगरे रा.जवळवाडी ता.पाथर्डी,नवनाथ उगलमुगले रा.काटेवाडी ता.पाथर्डी, मछीन्द्र राधाकिसन आठरे रा.आनंदनगर,पाथर्डी यांच्या विरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here