कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सरपंच व पैलवान काकासाहेब शेळके यांना राज्यस्तरीय आदर्श कुस्ती भूषण पुरस्कार देण्यात आला.
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मान करण्यात येते. यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श कुस्ती भूषण पुरस्कार कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सरपंच व पहिलवान काकासाहेब शेळके यांना डॉ रामकृष्णदास लहवितकर महाराज यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी विजय राऊत तनपुरे राधा, महाराज सानप, यादवराव पावसे, विजयाबाई कायावर, आयोजक बाबासाहेब पावसे यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कुस्ती कार्यक्षेत्रामध्ये सरपंच काकासाहेब शेळके त्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिले आहे. एक पहिलवान म्हणून देखील त्यांनी राज्यामध्ये आपला चांगला नावलौकिक निर्माण केला आहे. मानाचा भगवंत केसरी यादव केसरी खासदार केसरी याचप्रमाणे विविध कुस्ती स्पर्धा मध्ये विजय संपन्न केला असून मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा देखील काकासाहेब शेळके यांनी गाजवली आहे.
तालुक्यातील कोरेगाव येथे आदर्श सरपंच पुरस्कार यापूर्वीच त्यांना मिळालेला आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी अतिशय चांगले काम गावामध्ये केले आहे. त्यांच्या या सर्व सामाजिक व क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श कुस्ती भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी काकासाहेब शेळके यांचे अभिनंदन केले आहे.






