दिलासादायक! करोनावर आली गोळी… औषधाला अमेरिकेने दिली मंजुरी
वॉशिंग्टन: करोनाविरोधात लढाईत आता गोळीही आली आहे. अमेरिकेने या गोळीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ही कोविड गोळी फायझर कंपनीची आहे. ही कोविड गोळीचा नागरिकांवर उपचारास करण्यात अधिक उपयोगी ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.
जगातील बहुतांश देश करोनाविरुद्ध लढाई लढत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बुधवारी मोठा निर्णय घेतला. FDA ने करोनापासून सुरक्षेसाठी १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मोठा धोका असलेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी फायझरच्या कोविड गोळीला मंजुरी दिली आहे. हे औषध तोंडावाटे घ्यायचे आहे. हे औषध करोनाविरुद्धच्या लढाईत प्रभावी ठरेल, असे एफडीएचे शास्त्रज्ञ पॅट्रिझिया कॅवाझोनी यांनी सांगितले.
या औषधाची २२०० नागरिकांवर चाचणी करण्यात आली. जोखीम असलेल्या नागरिकांमध्ये या औषधाने हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका ८८ टक्क्यांनी कमी केल्याचे दिसून आले. फायझरच्या उपचारांना पूर्वी युरोपियन युनियनमध्ये अधिकृत केले गेले आहे.
अमेरिकेने औषधाच्या १० मिलियन कोर्सेससाठी आधीच पैसे दिले आहेत. करोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे अमेरिकेतही अनेक रुग्ण समोर आले आहेत. त्याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. त्याच वेळी, मर्कद्वारे विकसित केलेली आणखी एक कोविड गोळी नागरिकांच्या उपचारासाठी येत आहे. ही गोळीही पाच दिवसांसाठी घेतली जाते आणि या गोळीने करोनाचा उच्च धोका असलेल्या नागरिकांमध्ये धोका ३० टक्क्यांनी कमी केला, असं बोललं जातंय.






