अहमदनगर प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण विभागाने ही शाळा २३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेत अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे.
डमाळवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. तेथील मुख्याध्यापकांनी दोन दिवसांपूर्वी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये पाच विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर १५ विद्यार्थी आणि शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता खबरदारी म्हणून त्यांच्या पालकांचीही चाचणी करण्यात येणार आहे, असं जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. बाधित आढळून आलेल्या मुख्याध्यापकासह पाचही विद्यार्थी ठणठणीत आहेत. त्यांच्यावर नियमानुसार उपचार आणि दक्षता घेणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शाळांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागातील शाळा शहरांच्या आधीच सुरू झाल्या आहेत. मधल्या काळात नियमांचे पालन करण्यात शिथीलता आल्याचे दिसून येत होते. मात्र, ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने पुन्हा सर्वजण सावध झाले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत शाळा बंद असतानाही नगर जिल्ह्यात लहान मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीय होते. या पार्श्वभूमीवर सर्वच शाळांना दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here