जामखेड प्रतिनिधी

खर्डा या ठिकाणी विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. लवकरच होणार्‍या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी आज स्वत: या सोहळ्याच्या स्थळाची म्हणजे खर्डा भुईकोट किल्ल्याला भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली..

या वेळी कर्जतकर नागरिक आणि सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनीही वेळात वेळ काढून खर्डा किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता केली. याबाबत मी त्यांचा मनापासून आभारी आहे असे मत व्यक्त करुन आ. रोहित पवार यांनी अभार मानले. कोणत्याही सामाजिक कार्यात ही मंडळी स्वतःहून सहभाग घेतात, यातच कर्जतचं वेगळेपण आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. असे उद्गार काढून त्यांनी सहभागी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. खर्ड्याच्या किल्ल्यासमोर दसऱ्याच्या दिवशी झळकणा-या भगव्या ‘स्वराज्य ध्वजा’च्या स्तंभाची पाहणी करून कार्यक्रमासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या तयारीचा आढावा नुकताच आ रोहित पवार यांनी घेतला. तसंच यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नियोजनाबाबत चर्चा केली.

३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार आहे. दरम्यान खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीच्या कार्यक्रमाची लोकसहभागातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. समानतेचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यासाठी ग्रामस्थ व इतर मंडळींनी जय्यत तयारी सुरू केली आले. किल्ल्याचा परिसर स्वच्छ केला जात असून तिथली जुनी टाकी, विहीरी देखील साफ केल्या जात आहेत. युवावर्गाने उत्साहाने या ध्वजारोहणाच्या निमित्ताने होणा-या स्वच्छता मोहिमेत अत्यंत उत्साहाने भाग घेतल्याचं चित्र दिसत आहे. येत्या दस-याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना होईल आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here