शहाजीराजे भोसले यांच्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा; नान्नजमध्ये उद्या कडकडीत बंद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शहाजी रामचंद्र राजेभोसले यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नान्नज गाव रविवारी, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत नान्नज येथील ग्रामस्थांच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहाजीराजे भोसले यांनी आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने दि ७ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी नान्नज गाव संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमध्ये गावातील किरकोळ व घाऊक दुकाने, बाजारपेठ, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिक दुकाने दिवसभर बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार आहे. या बंदमधुन
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वैद्यकीय सेवा, रुग्णालये, औषधांची दुकाने आणि दूध पुरवठा या सेवांचा समावेश आहे. त्यामुळे या अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन
नान्नज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. हा बंद अत्यंत शांततेत, संयमाने आणि लोकशाही मार्गाने पाळण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी होऊन शहाजीराजे भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी उपोषणकर्ते शहाजीराजे भोसले यांनी मांडलेल्या मागण्या रास्त व जनहिताच्या असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदनाची प्रत देऊन आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.



