जामखेडमध्ये बनावट मावा निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त,

सुगंधित तंबाखू, सुपारी, तयार मावा व मावा बनविण्याचे साहित्य जप्त

जामखेड प्रतिनिधी

अहिल्यानगर येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड येथे बनावट मावा तयार करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१२ वाजता जामखेड तालुक्यातील
जांबवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात आरोपी विकास सोपान डिसले (रा. जांबवाडी, ता. जामखेड) आणि नदीम शेख (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपींकडून सुगंधित तंबाखू, सुपारी, तयार मावा, मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच मावा बनविण्याचे मशीन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे २० किलो सुगंधित तंबाखू, मोठ्या प्रमाणात सुपारी, ७ किलो तयार मावा आणि मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन यांचा समावेश असून, त्याची एकूण किंमत १ लाख ६ हजार रुपये आहे.

अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर यांच्या तपास अहवालानुसार, महाराष्ट्रात प्रतिबंधित व आरोग्यास अपायकारक असलेल्या पदार्थांचे मिश्रण करून मावा तयार करून विक्री करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींनी हा मुद्देमाल विकत घेतल्याची माहितीही पोलिसांसमोर दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत असून, संबंधित आरोपींच्या पुरवठा साखळीचाही शोध घेतला जात आहे.

चौकट

जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य गुटखा व मावा विक्री मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. चोरुन लपून छोट्या टपऱ्यान मधुन ही विक्री होत आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही गुटखा व मावा मिळतो कसा? का याचे लागेबांधे कोणापर्यंत आहेत? याचा तपास वरीष्ठ पातळीवरून होणे गरजेचे आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही कारवाई होत असली तरी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करुन गुटखा व मावा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here