


जामखेडमध्ये दुकानाच्या वादातून घरात घुसून मारहाण; चारचाकी वाहनाची तोडफोड, आठ जणांविरुद्ध गुन्हा
जामखेड प्रतिनिधी
भाड्याने घेतलेले दुकान खाली करण्याच्या कारणावरून फीर्यादीच्या गाडीवर हल्ला करित चारचाकी वाहनाची तोडफोड केली. तसेच घरात घुसून फीर्यादी यांच्या कुटुंबीयांना कोयता, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. या हल्ल्या प्रकरणी एकुण आठ जणांविरोधात जामखेड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समीर तैनुर खान (वय ३८, व्यवसाय – मार्केटिंग, रा. सदाफुले वस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, म्हंटले आहे की मी पत्नी, आई-वडील, भाऊ, भावजय व मुलांसह एकत्र राहातो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मार्केटिंगचे काम करतात. फीर्यादी समीर तैनुर खान यांनी भाड्याने घेतलेले दुकान हकीम आतार यांच्या मालकीचे असून, दुकान लवकर खाली करण्यासाठी फीर्यादीस वारंवार दमदाटी करण्यात येत होती.

दि ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फीर्यादी हे कामानिमित्त आष्टी येथे गेले होते. त्यावेळी हकीम आतार यांनी फोन करून सांगितले की तुम्ही जामखेडला या मला तुमच्या सोबत बोलायचे आहे त्यानुसार फीर्यादी हे जामखेड येथे परत आले. खर्डा रोडवर हकीम आतार यांची भेट झाल्यानंतर त्यांनी दुकानाची चावी फिर्यादीकडे दिली.
त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी समिर खान हे त्यांच्या चारचाकी वाहन क्र. (एमएच-१६ ए.टी-९२०४) याने घरी जात असताना खर्डा रोडवरील कॅफेनाज हॉटेलसमोर पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून काही जण खाली उतरले. त्यांनी कोयता व तलवारीने वाहनावर हल्ला करून वाहनाचे नुकसान केले.

यानंतर फिर्यादी समीर तैनुर खान हे आपल्या सदाफुले वस्ती येथिल घरी पोहोचल्यानंतर संबंधित आरोपी चारचाकी व मोटारसायकलवरून त्यांच्या घरापर्यंत आले. आरोपींनी घरात घुसून दगड, विटांनी तसेच कोयत्याने फिर्यादी, त्यांची आई झकिया खान आणि वडील तैनूर खान यांना मारहाण करून जखमी केले. फिर्यादीला कोयत्याने पाठीवर मारून जखमी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीची आई झकिया या सोडविण्यास आल्या असता त्यांनाही ढकलून देण्यात आले. तसेच हकीम आतार यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने तोडून नेले आहे. घटनेदरम्यान शेजारी राहणारे अलीशान जांगीर खान, फिरोज इस्माईल खान व वसीम नजिर खान यांनी मध्यस्थी करून आरोपींच्या तावडीतून कुटुंबाची सुटका केली. मात्र, आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यानंतर ते तेथून निघून गेले. घटनेनंतर जखमींनी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचार घेतले. त्यानंतर जामखेड पोलीस ठाण्यात समीर तैनुर खान यांनी फिर्याद दाखल दिली आहे.

या प्रकरणी मुजफर गनी आत्तार, हकीम आत्तार (पुर्ण नाव माहित नाही), अकीब उर्फ पिल्या आत्तार, साद आत्तार (पुर्ण नाव माहित नाही), आदर्श आत्तार (पुर्ण नाव माहित नाही), सोहेल जावेद आत्तार, आसिफ आत्तार (पुर्ण नाव माहित नाही), आणि जईद जावेद आत्तार (सर्व रा. जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध घरात घुसून मारहाण, वाहनाचे नुकसान, दागिना हिसकावणे, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. संजय लोखंडे हे करित आहेत.




