जामखेड तालुक्यातील नान्नज शिवारात कत्तलीसाठी डांबलेल्या ३ गोवंशीय जनावरांची सुटका

८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जामखेड तालुक्यातील नान्नज शिवारात धडक कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. १ ऑगस्ट) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना, नान्नज (ता. जामखेड) येथील हजारे यांच्या वीटभट्टीसमोरील मोकळ्या जागेत कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे बांधून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी छापा टाकला असता, उघड्यावर तीन गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेली आढळून आली.

घटनास्थळी स्थानिक गोरक्षक संजय तुकाराम पवार यांच्याकडे चौकशी केली असता, संबंधित जनावरे समीर कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही, रा. नान्नज, ता. जामखेड) याची असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने जनावरांना कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे डांबून ठेवल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ६० हजार रुपये किमतीचा एक गोवंशीय बैल आणि २० हजार रुपये किमतीचे एक गोवंशीय वासरू असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच आरोपी समीर कुरेशी हा घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित मधुकर मिसाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी समीर कुरेशी याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१३/२०२६ अन्वये ‘महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम’ (सुधारित २०१५) चे कलम ५(ब), ९ तसेच ‘प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम’ अंतर्गत कलम ३, ११(१)(अ) आणि ११(१)(ह) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध जामखेड पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, भगवान थोरात, रोहित मिसाळ आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here