जमीन वाद अन् धमक्यांना कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल

मृत्यूपूर्वी मोबाईल व्हिडिओने फोडला आरोपींचा भांडाफोड, खर्डा पोलीस स्टेशनमध्ये तणाव

जामखेड प्रतिनिधी

जमीन हडपण्याचा प्रयत्न आणि शेतातील विजेच्या पोलवरून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन दरडवाडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील विकास साहेबराव रणसिंग (वय ४०) या तरुणाने राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दि. २६ जुलै) रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास दरडवाडी येथील विकास रणसिंग यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. ही बाब त्यांची बहीण सुवर्णा पोडमल व पत्नी विद्या रणसिंग यांच्या निदर्शनास आली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खर्डा येथील लाड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे आणण्यात आला. यावेळी पत्नी विद्या रणसिंग यांनी मयत विकास यांचा मोबाईल तपासला असता, गॅलरीमध्ये आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ आढळून आले.

व्हिडिओमध्ये केला ‘या’ आरोपांचा पर्दाफाश

मयत विकास रणसिंग यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्तींवर थेट आरोप केले आहेत.

पहिला आरोप :

महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) हा त्यांची ६ गुंठे जमीन बळकावत होता आणि ती परत देत नव्हता. काही महिन्यांपूर्वी महादेव दराडे याने विकास रणसिंग यांच्या डोक्यात बाटली मारून भांडणही केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दुसरा आरोप :

शेजारील शेतकरी चतुर्भुज दाताळ (रा. बाळगव्हाण) याच्याशी शेतावरून व बांधावरून इलेक्ट्रिक पोलची लाईन नेण्यावरून वाद सुरू होता.
या दोघांकडून सतत धमक्या मिळत असल्याने वैतागून आपण आत्महत्या करत असल्याचे विकास रणसिंग यांनी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

खर्डा पोलीस ठाण्यात तणाव; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धाव

घटनेची माहिती मिळताच आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयत विकास रणसिंग यांचा मृतदेह खर्डा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात एकत्र आला. त्यामुळे काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी तातडीने खर्डा पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढत मयत विकास रणसिंग यांची पत्नी विद्या विकास रणसिंग (वय ३६) यांची फिर्याद नोंदवून घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर जमाव शांत झाला आणि वातावरण पूर्वपदावर आले.

कायदेशीर कारवाई व पुढील तपास

पत्नी विद्या विकास रणसिंग यांच्या फिर्यादीवरून महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) व चतुर्भुज दाताळ (रा. बाळगव्हाण) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here