


हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचे विनापरवाना जामखेडमध्ये वास्तव्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जामखेड शहरातुन त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड शहरात हद्दपार रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना आरळेवस्ती परिसरात दोन इसम विनापरवाना वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दि ६ मे २०२६ रोजी सापळा रचून सोनु कुंदन वाघमारे (वय ३४) व विक्रम भगवान डागर (वय ३७, दोघे रा. आरळेवस्ती, जामखेड) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनाही अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची खात्री झाली. हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल रमेश अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातून हद्दपार केलेले इसम विनापरवाना वास्तव्य करत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या ०२४६२-२८६९९९ या क्रमांकावर अथवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांनी केले आहे.








