


जामखेड नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
जामखेड प्रतिनिधी
तक्रारारदार यांचा मुलगा व मुलीच्या दोन जन्म दाखल्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर येथिल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जामखेड नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अभिजीत जालिम भैसडे, वय, ३९ पद लिपीक, जन्म मुत्यु नोंदणी विभाग नगरपरिषद, रा. मारुती मंदिरा समोर, तपनेश्वर गल्ली, जामखेड व अहमद इलियास शेख वय ४३, वर्षे पद मदतनीस अग्निशामक दल नगरपरिषद, (कंत्राटी) रा. काझी गल्ली खर्डा रोड, जामखेड अशा दोन आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी दि २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जामखेड नगरपरिषद येथे त्यांचा मुलगा व मुलगी यांचे जन्म दाखला मिळवा याकरता आवश्यक कागदपत्रे जोडुन व अर्ज देऊन नगरपरिषद विभागाच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागाचे कर्मचारी अभिजीत भैसडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी कर्मचारी भैसडे यांनी दुसरा अग्नीशामक विभागाचा कंत्राटी कर्मचारी अहमद इलियास शेख, यांची भेट घेण्यास सांगितले. तक्रारदार यांनी शेख यांची भेट घेतल्या नंतर कर्मचारी अभिजीत भैसडे यांच्यासाठी प्रत्येक दाखल्याचे १५०० रु या प्रमाणे दोन जन्म दाखल्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली होती.

यानंतर तक्रार यांनी याबाबत दि ५ मे २०२६ रोजी अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने बुधवार दि ६ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगरपरिषद समोर सापळा लावला व कंत्राटी कर्मचारी अहमद इलियास शेख यास अभीजीत भैसडे यांच्या ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वरील दोन्ही कर्मचाऱ्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अहिल्यानगरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजु अल्हाट, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पो.ना चंद्रकांत भिमसेन काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, चालक दशरथ लाड, यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे हे करत आहेत.








