लग्न समारंभातून फोटोग्राफरचा दीड लाखांचा कॅमेरा चोरीला

मंगलकार्यालयाची सुरक्षा राम भरोसे..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील बीड रोडवरील आदित्य गार्डन येथे सुरू असलेल्या एका लग्न समारंभादरम्यान फोटोग्राफरचा सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा कॅमेरा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेवरून मंगलकार्यालयाची सुरक्षा राम भरोसे आसल्याचे दिसुन येत आहे.

जामखेड शहरातील पोकळे वस्ती, येथील अस्लम सुलतान शेख (वय २५) हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. त्यांना एका लग्न सोहळ्याचे छायाचित्रण करण्यासाठी आदित्य गार्डन येथे ऑर्डर मिळाली होती. दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ते कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून दिवसभर फोटोग्राफीचे काम करत होते.

सायंकाळी सुमारे ५ वाजता वधू निरोप समारंभानंतर त्यांनी आपला सोनी अल्फा मार्क फोर कॅमेरा, सिगमा ८५ एमएम लेन्स, २८-७० सोनी लेन्स, चार्जर व मेमरी असलेली बॅग आदित्य गार्डनच्या स्टेजवर ठेवली होती. यानंतर काही वेळाने बॅग घेण्यासाठी गेले असता ती जागेवर आढळून आली नाही.

आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता कोणालाही याबाबत माहिती नसल्याने अज्ञात चोरट्याने बॅग चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

चौकट

सध्या मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभ सूरू आसुन चांगल्या सुविधा व सुरक्षा यामुळे कार्यालयाला लोक पसंती देतात, परंतु चोरी झालेल्या मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने आनेक चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे तपासाकरिता आडचण निर्माण होत आहेत त्यामुळे लग्न समारंभात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here